डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी या भारतीय आयटी कंपनीने कोरियासाठी 'डेटामेल' ही ईमेल सेवा सुरू केली आहे. या डेटामेलचे वैशिष्ट्य असे की, या ईमेल सेवेवर स्थानिक भाषेतूनच ईमेल अॅड्रेस तयार करता येतील. दक्षिण कोरियातील सेऊल येथे या सेवेची नुकतीच घोषणा करण्यात आली.
डेटामेल सेवेचे वैशिष्ट्य असे की, यापूर्वीही या कंपनीने स्थानिक भाषांमधून ईमेल अॅड्रेस तयार करण्याची सोय केली आहे. अरेबिक, रशियन, थाय आणि चीनी भाषांमधून ईमेल सेवा उपलब्ध करून दिली आहे. डेटा एक्सचेंज टेक्नॉलॉजी ही जागतिक स्तरावर स्थानिक भाषेत ईमेल सेवा उपलब्ध करून देणारी पहिली भारतीय आयटी कंपनी आहे. आता कोरियन भाषेतही ही सेवा उपलब्ध होईल.
ही ईमेल सेवा व्यक्तींसाठी निःशुल्क आहे, तर कोर्पोरेट क्षेत्रासाठी शुल्क घेतले जाते. तसेच ही सेवा अॅपमार्फत इन्स्टॉल करता येऊ शकते. डेटामेलमध्ये 'सिक्रेट किपर' नावाचे वैशिष्ट्य आहे, ज्यात तुमचे ऑनलाईन तपशील, पासवर्ड सुरक्षित राहतील. जागतिक स्तरावर ईमेल अॅड्रेससाठी इंग्रजी भाषेचे वर्चस्व आहे. कोरिया ही जगातील एक मोठी बाजारपेठ असल्याने डेटामेल सेवेसाठी कोरियन भाषेची निवड केली गेली. या सेवेचा मोठा उपयोग हा तेथील गतिशील अर्थव्यवस्थेला तसेच सॅमसंग, एलजी, ह्युंडाई, लॉटी अशा अनेक कंपन्यांना होईल.
सध्या ही कंपनी 15 भारतीय भाषांसहित चीनी, अरेबिक, थाय, सिरिलिक वगैरे भाषांमध्ये ईमेल अॅड्रेस पुरवते आहे. तुम्ही http://우편.우편.닷컴किंवा http://mail.datamail.asiaला भेट देऊ शकता किंवा IOS अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरमधून विनामूल्य डेटामेल मोबाइल अॅप डाऊनलोड करू शकता. क्रोम, फायरफॉक्स, इंटरनेट एक्स्प्लोरर, ओपेरा, सफारी, नेटस्केप आणि फ्लॉक्स सारख्या लोकप्रिय ब्राउझरचा उपयोग करून कम्प्युटर मार्फत ते उपलब्ध होऊ शकते.